Saturday, April 15, 2023

“संजय, तुला आठवताना...”


“संजय, तुला आठवताना...”


संजय, (बप्पा) आज तू आम्हा सगळ्या पासून जाऊन दोन वर्ष होत आहेत. तुझ्या 'जाण्या' वर लिहणं खूप कठीण आहे. त्या आठवणी उसविताना जिकरीच्या वेदना होत आहेत. तुझे ‘जाणं' आणि त्याच बरोबर त्यानंतर ७ दिवसात आपल्या   तीर्थस्वरुप आई-वडिलांचे व पुढे १६ दिवसात भाऊ सुनीलचे 'जाणे' आठवते अन क्षणा-क्षणाला रडू कोसळते. परंतु तुझं जगणं, तुझं लिहणं, साहित्य-सांस्कृतिक विश्वाला वाहून घेणं व तुझ्या सोबतच्या आठवणींना तुझ्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्य उजाळा द्यावा म्हणून प्रस्तुत प्रपंच. 

उस्मानाबाद पासून २२ किलोमीटर दूर बालाघाटच्या डोंगर उतारावरच्या चोराखळी या छोट्या गावात आमचा जन्म झाला. आमचे गाव चोराखळी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे आजोळ. अहिल्यादेवीनी बांधलेले महादेवाचे पापनाश मंदिर हे आमचे ग्रामदैवत. आमचे आजोबा तात्याबा नवले यांच्या कडे ५२ एकर जमीन व ३८ एकर डोंगर, त्यामुळे शेती हाच खानदानी व्यवसाय. खानदानात वडील पहिलेच ज्यांनी शाळेची पायरी चढली. कारण शिक्षण हे काम आपले नाही ही आमच्या आज्जी-आजोबा (माई व तात्या) सह एकूण सगळ्यांचीच त्या वेळेची धारणा. वडील कुटुंबातीलच नाही तर गावातील ग्रॅज्युएट आणि शिक्षक होणारे पहिलेच! ते शिकले म्हणून त्यांच्या पावलावर पावले टाकत पुढे धाकटे चुलते भागवत बाबा, चुलत भाऊ तुकाराम आप्पा व उर्वरित आम्ही सख्खे व चुलत बहीण-भावंडे शिकलो. आमच्यात संजय व मी आम्ही दोघे पीएच.डी., सुनील एम.बी.ए. तर बहीण ज्योतीने एम. ए. बी. एड. पर्यंतचे शिक्षण घेतले. संजय, (घरातील प्रेमाचे व लाडाचे नाव "बप्पा') हा आम्हा ३ भावा व एक बहिणी मध्ये थोरला होता. 

उस्मानाबादच्या रा.प.महाविद्यालयातील संजयच्या  पदवी काळातील सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमातील सहभाग, त्याचा पत्रकारितेशी आलेला संबध, बाबा आमटेंच्या भारत जोडो अभियानातील सहभाग व बाबा आमटें सोबतची प्रत्यक्ष भेट, डॉ. सोमनाथ रोडे सोबतची आनंदवनातील श्रम-शिबिरे, भारत-जोडो संदेशाचा प्रचार  करण्यासाठी  भारतभर आयोजिलेल्या  सायकल यात्रेत, सोमनाथच्या आंतरभारती श्रम-संस्कार छावणी मधील सहभाग यातून त्याच्या सामाजिक संवेदना विस्तारु लागल्या. याच काळात त्याच्या लेखणीला अंकुर फुटले व पुढे पदव्युत्तर, पीएच.डी. व प्राध्यापक म्हणून अध्यापनाच्या सुरवातीच्या काळापासून फुले, शाहू, आंबेडकरांच्या परिवर्तवादी विचाराच्या प्रभावाने त्याच्या लेखणीने उभारी घेतली. त्याने दै. कुलदैवत, दै. संघर्ष, दै. कष्टकरी लोकहित दै. संचार, दै. तरुण भारत, दै.लोकहित, दै. लोकमत आदी प्रसिद्ध दैनिकातून, तर विचार-शलाका, अस्मितादर्श सारख्या प्रसिद्ध नियतकालिके व विविध दिवाळी अंक यातून मराठी-हिंदी कथा, कविता व इतर लेख लिहण्यास सुरुवात केली.  पुढे त्याची स्व/सह -लिखित/भाषांतरित/संपादित अशी ७३ पुस्तके त्याच्या नावावर आली. ,

संजयचे बी. ए. झाल्यावर व एम. ए. प्रथमला लातूरला प्रवेश घेतल्यावर त्याने ढोकी येथील डी.सी.सी. बँके मध्ये क्लार्क/कॅशिअर म्हणून नौकरी केली. उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही  कांही वर्षे काम  पहिले. तो नियमित कॉलेज न करताही एम. ए. ला विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकला आणि डॉ. रणसुभे सरांनी त्याला भेटण्याचा निरोप पाठवला.  त्याच्या आयुष्यात डॉ. रणसुभे सर सारखे साहित्यिक व विचारवंत थोडे उशिरा का होईना पण येणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याला उत्तरप्रदेशच्या मधुकर सिंहच्या दलित साहित्यावर पीएच.डी. करण्यास सांगणे, पुढे ती त्याने पूर्ण करणे. या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा व मराठी-हिंदी दलित साहित्यिक व विचारवंताचा पगडा त्यावर पडणे याने त्याच्या वैचारिक, साहित्यिक, सामाजिक संवेदना रुंदावल्या व प्रगल्भ झाल्या.

जुलै १९९१ ला तो तेरणा महाविद्यलाय, उस्मानाबाद येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाला. तेंव्हाच त्याचे लग्नही झाले. पुढे १९९४ मध्ये तो कर्मवीर डॉ. जगदाळे मामांच्या श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाला.  तिथे असतानाच त्याची पीएच. डी. झाली. तिथे त्याने साहित्या बरोबरच वक्तृत्व, कला, नाट्य, संगीत यात स्वतःला झोकून दिले. कॉलेज व विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमात त्याने हिरीरीने भाग घेतला. अनेक विध्यार्थ्यांना बोलते-लिहिते केले, संशोधन करण्यास प्रवर्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून त्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाला ओळखून त्याला सकारात्मक वळण दिले.  समाजातील व्यंगावर 'प्रतिक्रिया' म्हणून नव्हे तर 'प्रतिकार' म्हणून एकांकिका, प्रहसिका लिहल्या, वक्तृत्व वादविवादाची मुलं तयार केली, समाजाला जागे करणारे, डोक्याला झिणझिण्या आणणारे वासुदेव, भारुड, गोंधळ, लोकनृत्य आदी विविध कला प्रकार सादर केले आणि बक्षीसच काय तर कित्येक वेळी कॉलेजला विद्यापीठीय युवक मोहत्सवात जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली. या यशामुळे तो सोलापूर विद्यापीठाच्या विध्यार्थी कल्याण मंडळाचा संचालक झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट, हिंदी अभ्यास मंडळ, कला विद्या शाखा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग आदींवर सदस्य म्हणून तर विद्यार्थी कल्याण मंडळाचा संचालक म्हणून यशस्वीपणे काम पहिले. त्याच्यात कामाची प्रचंड ऊर्जा होती. अनेक नेत्रदीपक युवक-महोत्सव त्याने आयोजिले. रंगमंच फुलवले. हजारो विध्यार्थ्यांना कलाकार म्हणून घडवले. त्याचे योगदान पाहून मा. कुलगुरु डॉ. बंडगर सरांनी त्याच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकपदाच्या टर्मला सलग तीन वेळा एक्स्टेंशन दिले. त्याने आयोजिलेल्या कितीतरी विद्यापीठीय युवा-महोत्सवाचा प्रेक्षक व परीक्षक म्हणून मी स्वतः साक्षीदार आहे. बार्शी येथे त्याची प्रॅक्टिस बघायला तो अनेकदा वडिलांना बोलवायचा. त्याच्या बहुतेक कलाकार-विद्यार्थ्यांची आमच्या वडिलांची चांगली गट्टी होती.  त्याचं युवा-महोत्सवाचे आयोजन म्हणजे सांस्कृतिक सृष्टीतील सप्तरंगी इंद्रधनूच जणू! कॉलेज व विद्यापीठातील तरुणांच्या ‘झूंडी’ ला कलाकाराच्या अव्वल 'टीम' मध्ये बदलणारा किमयागार होता तो.

विविध वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कौटोंबिक आव्हाने झेलत, प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत, स्वतःला अभिप्रेत असणाऱ्या रस्त्यावरुन ठामपणे वाटचाल करत अखेरीस त्याची औरंगाबादच्या विद्यापीठात प्रोफेसर पदी निवड झाली आणि २० ऑगस्ट २०१३ रोजी तो हिंदी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर पदी रुजू झाला.

या प्रवासात त्याने मराठी व हिंदी मध्ये पुष्कळ लिखाण केले. वैचारिक, सामाजिक लेख, लघु-कथा, पुस्तके, भाषांतरे, संपादन, समीक्षण आदी. परंतु त्याने 'साहित्यिक' या शब्दाची झूल पांघरली नाही, मी साहित्यिक नाही तर एक अभ्यासक व समीक्षक आहे असेच तो नेहमी म्हणायचा.  त्याच्या बार्शी आणि औरंगाबादच्या दोन्ही घरी त्याच्या स्वतंत्र अभ्यासिका होत्या. तो तंत्रज्ञानाकडे जास्त ओढला गेला नाही. कॉम्पुटर, लॅपटॉप, इंटरनेटशी त्याचे विशेष सख्खं नव्हतं.  त्याला या सगळ्या तांत्रिक बाबी पेक्षा वाचायला व लिहायला खूप आवडायचे.  त्याच्या अभ्यासिकेत तो दिवस-रात्र स्वतःला कागद-पेनाशी बांधून घेत विषयाशी झुंजत असायचा. २२ हिंदी व २ मराठी स्व-लिखित/भाषांतरित पुस्तके, १३ सह-लिखित पुस्तके, १४ संपादित अशी ७३ ग्रंथसंपदा, ९० नियतकालिकेतील पेपर्स व पुस्तकातील चॅप्टर्स, १०३ विविध पातळीवरील भाषणे, ३१ वर्तमान पत्रातील लेख, ही आमच्या बप्पाची संपत्ती! कितीही वाटली तरी न आटणारी!   

मला तरी वाटते कि एखादया विषयावर 'लिहायलाच हवं' या 'गरजेतून' तो लिहीत गेला. विषमतेला पूर्ण वाव देणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात बोलणं-लिहणं त्यानं पसंत केले. गरज भासेल तेंव्हा उत्खननही केले आणि प्रश्नांची ‘पहार’ घेऊन त्याने जिथे व ज्या वेळी करायचे ते ‘प्रहार’ ही केले. अनुवाद या साहित्याच्या काठापासून थोडा आत तर केंद्रा पासून कैक अंतर दूर असणाऱ्या जटिल व गुंतागुंतीच्या साहित्य प्रकारातही तो अव्वल राहिला हे त्याच्या 'श्रीधरपंत टिळक और डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या अनुवादित ग्रंथास भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयचा मिळालेल्या एक लाख रुपयाच्या अनुवाद पुरस्कारातुन स्पष्ट सिद्ध होते. कित्येक मराठी फुलांना हिंदीचा सुगंध दिला त्याने.  त्याच्या मृत्यू पश्चात आलेल्या माजी कुलगुरु, लेखक व विचारवंत डॉ. जे. एम. वाघमारे सरांच्या 'गुलामी' पुस्तकाच्या 'गुलामी: इतिहास के आईने मे' हे त्याचा विध्यार्थी डॉ. नैनवाड सोबतचे हिंदी भाषांतर त्याचे उत्तम उदाहरण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर पदी रुजू झाल्या नंतर त्याच्या वाचन, लिखाण, अनुवाद, व्याखाने, समीक्षणे यांनी अधिक वेग घेतला.  सोबतच विविध पदे/समित्या वर काम केले. प्रोफेसर, विभागप्रमुख, हिंदी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष, युवा महोत्सवाचा संयोजक, अश्वमेध क्रीडा महोत्सव, केंद्रीय युवक महोत्सव समितीचा सदस्य म्हणून योगदान दिले. महाराष्ट्रासह भारतातील २८ स्टेट व सेंट्रल युनिव्हर्सिटी बरोबरच भारताबाहेरील मॉरिशिसच्या युनिव्हर्सिटीच्या पीएच. डी. चा बहिस्थ परीक्षक म्हणून त्याने काम केले, प्रबंध तपासले, मौखिकी घेतल्या. एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई व गुलबर्ग्याच्या केंद्रीय विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळचा सदस्य व डॉ. बा. आं. म. विद्यापीठात महात्मा गांधी अध्यासन केंद्राचा संचालक म्हणून अश्यातच मिळालेली जबाबदारी अश्या कितीतरी बाबी इथे नोंदवता येतील.

सद्या बोकाळलेल्या पुरस्कार अपसंस्कृतीकडे तो कधी ओढावला नाही. आतापर्यंत त्याला सोलापूर रोटरीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्लीची 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’, इंदौर चा ’अखिल भारतीय प्रतिभा सन्मान पुरस्कार’, बौध्द साहित्य सम्मेलनचा ’डॉ. भदंत आनंद कौसल्यायन अनुवाद पुरस्कार', भारत सरकार, मानव संसाधन विकास मंत्रालयाचा १ लाखाचा ‘अनुवाद पुरस्कार’, केद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या हिंदी भाषा समितीवर सल्लागार म्हणून नियुक्ती आदी मान-सन्मान मिळाले.  यातील ’डॉ. भदंत आनंद कौसल्यायन अनुवाद पुरस्कार', तर सकाळ समूहाचे संपादक मा. उत्तम कांबळे यांच्या हस्ते त्याच्या अनुपस्थित त्याच्या वतीने मी स्वतः जाऊन स्वीकारला.

कुण्याही समविचारी ओळखीचे रुपांतर स्नेहाच्या स्निग्धतेमध्ये करण्याची लकब त्याच्याकडे होती. तो त्या जोडलेल्या माणसाशी तितक्याच संवेदशील मनाने चिटकून राहीचा. त्याला माणसाच्या गराड्याचा नाद होता, गोतावळ्याचा मोह होता. अंतरंगातून खूप हळवा व संवेदनशील होता तो. रक्ताच्या माणसाइतकेच जोडलेल्या माणसावर भरभरुन प्रेम केले त्याने.  तेरणा कॉलेज उस्मानाबाद व श्री शिवाजी कॉलेज, बार्शी या प्रवासा दरम्यान त्याने लातूरच्या दयानंद आर्ट्स कॉलेज मध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी इंटरव्ह्यू दिला होता. त्यात त्याचे मित्र जोगेंद्रसिंह बिसेन यांचे सलेक्शन झाले जे पुढे दयानंद कॉलेजचे विभागप्रमुख, नॅक कॉर्डिनेटर, प्राचार्य झाले व आज नांदेड विद्यापीठाचे प्र-कुलगुरु आहेत. प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्या मैत्रीत किंवा संबंधात कधीच कटुता किंव्हा दुरावा दिसला नाही. तो त्यांना नेहमी भेटायचा. तो त्यांच्या वक्तुत्व, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचे व प्रशासकीय कौशल्याचे भरभरुन कौतुक करायचा, त्यांचे मार्गदर्शन घ्यायचा व त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांची मैत्री पहिली आहे. माझ्या नौकरी व अकॅडेमिक करिअर मध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे ते त्यांच्या मैत्री मुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर पदी इंटरव्यू मध्ये त्याचे प्रतिस्पर्धी होते तेथीलच डिपार्टमेंटच्या डॉ. भारती गोरे व जळगाव विद्यापीठातील डॉ. सुनील कुलकर्णी. त्यात सलेक्शन झाले संजयचे. मात्र पुढे त्यांच्या संबंधात कधी वितुष्ट तर दिसले नाहीच तर बहरणारी मैत्री व प्रेमळ संबंधच दिसून आले. डॉ. भारती गोरे यांनी तर तो गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर कृतज्ञपर हिंदी व मराठीत लेख लिहिले. या तिघांनीही इतरांबरोबरच ऑनलाईन शोकसभेत त्याच्याविषयी भरभरुन बोलतानाच नाही तर ओशाळताना मी पाहिले. त्याचे कला, सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील मार्गदर्शक/मित्र बहुतेक सर्वच विद्यापीठ परिक्षेत्रात होते.  डॉ सूर्यनारायण रणसुभे, कै. अंबादास देशमुख, साहित्यिक माजी कुलगुरु डॉ. जे. एम. वाघमारे, लेखक शरणकुमार लिंबाळे, उत्तम कांबळे, जय प्रकाश कर्दम, डॉ. प्रल्हाद लुलेकर, रतनकुमार सम्भारिया, माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, डॉ. दासू वैद्य, सहकारी डॉ. माधव सोनटक्के, डॉ. सुधाकर शेंडगे, पत्रकार रणजित खंदारे, दयानंद माने, संजय शिंदे, मित्रांमध्ये प्रा. संभाजी भोसले, उच्च शिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने. नांदेडच्या विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, डॉ. मुस्तजीब खान, डॉ.अर्जुन चव्हाण, डॉ. सदानंद भोसले, कॅ. नितीन सोनजे, प्राचार्य शेंडगे, डॉ. वसंत कोरे, डॉ. भगवान अदटराव, डॉ. कोळेकर, डॉ. भारत हंडीबाग, सुरेश टेकाळे, इंजिनिअर विठ्ठलराव गडदे, विजय राऊत, आ. राजा राऊत, प्राचार्य डॉ. अशोक घोलकर, उमेश सलगर, दिलीप बडे, काका शिंदे, श्रीकांत नाडापुडे, दिलीप भोसले, गणेश चंदनशिवे, डॉ. मिलिंद माने, सुभाष राठोड, किशोर लोंढे, राजा साळुंके, जयभीम शिंदे, संजय पाटील तर विद्यार्थ्यांमध्ये डॉ. सतीश वाघमारे, डॉ. नितीन कुंभार, डॉ. संजय नैनवाड, प्रा.भोई सारखे शेकडो विध्यार्थी असा भला मोठा गोतावळा होता. यातील बहुतेक लोकांचे तो दवाखान्यात ऍडमिट असताना त्याच्या तब्बेतीची विचारपूस करणारे मला कितीतरी फोन आले होते. कुठल्याही गटबाजीत तो अडकला नाही. या सगळ्यांशी त्याचे खूप सलोख्याचे संबंध होते. तो स्वतः पुरता, कुटुंबापुरता उरलेला नव्हता. तो या सर्वांचा होता, हे सर्व त्याचे होते !

आमच्या कौटुंबिक जीवनात व जन्मापासूनच्या प्रवासात विशेष चढ-उतार, ताण-तणाव, तीव्र मतभेद, अबोला असे आम्ही कधीच कुणी अनुभवले नाही. आम्ही करत असलेल्या कामा विषयी, एकमेकांविषयी उत्कटता, प्रखर सह-संवेदना व एकमेकांसाठी सहकार्य हेच केंद्रस्थानी होते. त्याच्या बाबतीतचे कितीतरी प्रसंग आज डोळ्या समोर येतात. माझ्या बारावीनंतर त्यानेच जाऊन माझा मार्क-मेमोही काढला व बी. ए. चा प्रवेश फॉर्म त्यानेच भरला. नंतर मला कळाले त्याने मराठी ऐवजी इंग्लिश हा विषय मला दिला होता. इंग्लिश हा इम्पॉर्टन्ट विषय होता तर तू का घेतला नव्हतास? स्वतः हिंदी घेतलास आणि मला अवघड इंग्लिश दिलास? म्हणून मी त्याला त्याच्या मित्र समोर भांडलोही होतो. पण मला एम. ए. झाल्यानंतर २-३ महिन्यातच प्राध्यापक म्हणून नौकरी लागली तेंव्हा व आताही त्याच्या निर्णयाचे महत्व कळते. मी एम.ए. इंग्रजीला असताना कॉलेज च्या इलेक्शनला उभारलो होतो व निवडून येऊन दयानंदच्या विध्यार्थी संसदेचा सह-सचिवही झालो. वडिलांनी विरोध केला होता मात्र संजय व सुनीलने मला मदत केली. त्याला आम्हा दोन्ही भावांचा खूप अप्रूप व अभिमान होता. सुनील हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड चा बीझनेस हेड, ऑपरेशनल लीडर म्हणून तर मी उदगीरला शिवाजी कॉलेजमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून काम करत. तो आमचे भरभरुन कौतुक करायचा. आम्ही एकमेकांच्या सुख-दुःखातही नेहमी सहभागी असायचो. दवाखाना, आजारपणात एकत्र यायचो. सुनील व संजयचे सासरे वृद्धापकाळाने गेले. आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एक न एक सदस्य त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेला. आम्हा चारी भावा-बहिणीचा तर एकमेकांवर जीव होताच होता पण आम्हा सर्वांची कमजोरी होती ती म्हणजे आमचे आई-वडील. तेंच आमची ताकत ही! त्यांना आम्ही 'भऊ' 'ताई' म्हणायचो. त्यांना त्यांचे भाऊ व भावकीत भाऊ व ताई म्हणायचे. लहानपणी आम्ही ‘भऊ’ व ‘ताई’ हे शब्द पकडले व तीच नावे पुढे आम्हा सगळ्याच्या अंगवळणी पडली. संजयवर परिवर्तनवादी विचाराचा पगडा होता परंतु तो नास्तिक कधीच नव्हता. आमची ग्रामदेवता पापनाश, येडेश्वरी, तुळजाभवानी व अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा तो भक्त होता.त्याच्या गाडीमध्ये स्वामी समर्थांचा मंत्र हमखास वाजायचा.

९ मार्च २०२० ला महाराष्ट्रात कोविडचा पहिला पेशंट आढळला होता, तोही पुण्यात. हळू-हळू पुणे-औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात कोविड केसेस वाढत होत्या. कोविड इन्फेक्शनचा सर्वात जास्त धोका वृद्ध व्यक्तीला आहे अशी डॉक्टरची मते, संशोधने प्रसार माध्यमे व व्हाट्सअँप वर येत होती. आई-वडिलांची आम्हा सर्वाना चिंता होती. प्रवासावर निर्बंध आणखीन आलेली नव्हती. लातूर जिल्यात एकही कोविड केस नव्हती. उदगीर हे सेफ होते म्हणून आम्ही सर्वानी ठरवले आई-वडिलांना उदगीरला आणावे. शेवटी ते तयारही झाले.  त्यावेळी शाळा-महाविद्यालयामध्ये अजून झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चा वापर सुरु किंवा रुढ झालेला नव्हता पण आम्ही सर्व फॅमिली आई-वडिलांशी गप्पा मारण्यास झूम वर मिटिंग घेत. फोन, व्हिडीओ कॉल तर चालूच असायचे. इथे आई-वडील असल्यामुळे सर्वात जास्त निर्बंध माझ्यावर. पेपर बंद. दूध पॉकेट तेही सॅनिटाईझ करुनच. वडिलांना २-३ पेपर्स वाचायला लागायचे. ते कधी माझ्या लैपटॉपवर किंवा त्यांच्या मोबाईलवर वाचू लागले. मार्च, एप्रिल व मे, ३ महिने होउन गेले. आई-वडील इथेच अडकून पडले. जून आला तरी कोरोना कमीही होईना व प्रवासावरचे निर्बंध हटत नव्हते. सर्वच पॅनिक झालो होतोत. दैव कृपेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत आम्ही सर्व सुखरुप राहिलोत.

कोरोनाची दुसरी लाट आली. केसेस/मृत्यू-रेट खूप वाढलेला होता. दवाखान्यात बेड खाली नव्हते.  या दुसऱ्या लाटेत आमच्या कुटुंबात कोरोनाची पहिल्यांदा लागण झाली ती मला दि. १ एप्रिल २०२१ रोजी. असिम्फटोमॅटीक इन्फेक्शन असल्यामुळे, जास्त त्रास नसल्यामुळें व सी. टी. स्कॅन स्कोर झिरो असल्यामुळे ऍडमिट होण्याऐवजी डॉक्टरकडून फॅबिफ्लू व इतर मेडिसिन चा कोर्स घेऊन होम क्वारंटाईन झालो. कुटुंबातील सगळ्यांचे फोन आले. संजयचा फोन दुपारी साडे-तीनच्या आसपास आला. तो मला काळजी घे म्हणून सांगत असताना अधून मधून तो  खोकत होता, बोलतान पॉज होतानाचे जाणवले.  मी त्याला फोन करुन आर.टी.पी.सी.आर. करण्यास सांगितले, पुण्याहून, बीडहून ही त्याला सर्वांनी दवाखान्यात दाखवून घेण्याचा सल्ला दिला होता.  दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला परत आर.टी.पी.सी.आर. टेस्ट केले का नाही हे विचारण्यासाठी फोन केले तर त्याने अगोदरच अँटीजन टेस्ट केलेली असल्याचे व त्यात निगेटिव्ह आल्याने काळजी करु नये हे सांगितले. दुसऱ्या दिवशी कळाले त्याचे निकटवर्तीय मित्र इंजिनिअर श्री. विठ्ठलराव गडदे साहेब त्यांनी त्याला धूत हॉस्पिटल मध्ये सी.टी. स्कॅनला नेले आणि तिथे सी.टी. स्कॅनचा इन्फेक्शन स्कोर १२ डिटेक्ट झाला होता व त्याला डॉ. कंदरफळे यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांनी ऍडमिट केले. १२ सी.टी. स्कॅनचा इन्फेक्शन स्कोर हे सर्वानाच काळजीत टाकणारा होता. सतीश वाघमारे हा संजयचा विद्यार्थीच नाही तर आमच्या कुटुंबातील सदस्या सारखा होता. संजयचा ड्राइवर चाचा आणि सतीश आमच्या चोराखळी, पुणे, बीड, उदगीरच्या घरी किचन पर्यंत पोहोंचलेले होते. सतीशशी मी सविस्तर बोललो. तो  संजय कडे पोहंचला. तो त्याच्या जीवाची, कुटुंबाची रिस्क घेऊन त्याच्या सेवेत होता. 

            सतीश व संजयचे दुसरे कांही विध्यार्थी मित्र नियमित त्याच्या घरीहून संजय साठीचा डब्बा, इतर लागणारे साहित्य आणून देत होते. संजयच्या मावस मेव्हण्यां, इतर मित्रही डबे पाठवणे व इतर सेवा पुरवीत होते. त्याची ऑक्सिजन लेवल स्टेबल होती. आम्ही सर्व निश्चिन्त होतोत. सर्व व्यवस्थित चालू होते. त्याला नॉर्मल ऑक्सिजन मास्क लावलेला होता. पण तो फोनवर सारखे मित्रांना, विध्यार्थ्यांना बोलत होता. बोलण्यासाठी ऑक्सिजन मास्क बाजूला काढत होता, त्यामुळे त्याचा ऑक्सिजन फ्लक्चुएट होत होता असे कळले.  वडिलांनी, आईने व सुनीलने व्हॉइस रेकॉर्ड करुन काळजी करु नको, धीर धर, फोनवर मास्क काढून बोलू नकोस, लवकरच तुला पुण्याला शिफ्ट करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत असे त्याला व्हाईस मेसेज व्हाट्सअँप वर सेंड केले.  तिथे आय.सी.यू. मध्ये कांही कॅज्युल्टीज झाल्या होत्या. त्या डेड-बॉडीज कैक तास तेथेच पडून होत्या. हे तो सगळे डोळ्यांनी बघत होता. तो साइकोलॉजिकल भयानक डिस्टर्ब व पॅनिक झाला होता. आम्ही सर्व कोशिश करत होतोत, पुण्याला एकही बेड खाली नाही ही त्यावेळी टी.व्ही. वर ब्रेकिंग न्यूज येत होती.  सुनीलच्या ओळखी असणाऱ्या 'कोलंबिया एशिया' हॉस्पिटल मध्ये जिथे आम्हा सर्वांच्या ट्रीटमेंट होत तिथेही बेड उपलब्ध नव्हता. औरंगाबादची स्थिती सुद्धा कांही वेगळी नव्हती. तरीही तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या इच्छेखातीर श्री. गडदे साहेब व तेथील सर्वानी प्रयत्न करुन ‘एम्स हॉस्पिटल’ मध्ये एक बेड मिळाला तिथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. हे सुनीलला कळवले. त्याने व वडीलानी गडदे साहेब व भोसले सरांकडून हॉस्पिटल अकाउंटचे डिटेल्स घेऊन आर्ध्या तासात पूर्ण हॉस्पिटल व मेडिकलचे बील ऑनलाईन ट्रान्स्फर करुन पेड केले व तो एम्स हॉस्पिटलला शिफ्ट झाला. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात-आठच्या आसपास सुनीलचा फोन आला. तो व वहिणी दोघे औरंगाबादकडे ४-५ दिवस किंवा तो बरा होई पर्यंत तिथे राहण्याच्या तयारीने निघाले आहेत. वडिलांना येणे किंवा आणणे शक्य नव्हते.  तो मी कोविड पॉजिटीव्ह असल्याचा ९ वा दिवस होता. मला टेस्ट करुन निगेटिव्ह निघाल्यास त्याच्याकडे जाण्याच्या वडिलांच्या सूचना होत्या. पण सुनील तिकडून निघाला म्हणून मलाही राहवले नाही. येथे मी पॉजीटीव्ह आहे हे सर्वांना माहीत असल्यामुळे ड्राइवर किंवा भाड्याची गाडी मिळणे अवघड होते. लॉकडाऊन होते. ट्रॅव्हल पास नव्हता. त्यावेळीच्या कोविड प्रोटोकॉल नुसार १० दिवसानंतर पॉजिटीव्ह चे निगेटिव्ह गृहीत धरले जायचे.  माझ्या एका कुटुंब सदस्य असणाऱ्या विध्यार्थी ड्राइव्हर मित्राला घेऊन मी रात्री नऊला औरंगाबादकडे निघालो. सुनील स्वतः ड्रायविंग करत रात्री ११-१२ च्या आसपास पोहचुन त्याला भेटला  तर मी रात्री २ वाजता भेटलो. सुनील तो बरा होईपर्यंत तिथेच राहायच्या सर्व तयारीने आला होता.  मी माझ्या गाडीतच ड्राइवर सोबत हॉस्पिटल बाहेर आराम केला. सकाळी मला उशिरा कळले त्याचा हॉटेल बुक करण्याचा प्रयत्न लॉक-डाउनच्या कडक निर्बंधामुळे यशस्वी झाला नाही.  कोविडच्या भीती मुळे कुणी आत घ्यायला तयार नव्हते. हॉटेल बाहेर गाडीत झोपून त्या दोघांनी रात्र काढली व सकाळी दवाखान्यात आले. रात्री व पहाटेही संजयचा ऑक्सिजन ९२-९८ च्या आसपास फ्लक्चुएट होताना मॉनिटर वर दिसत होता.

दुपारी ११ च्या दरम्यान प्रा. संभाजी भोसले तुळजापूरहुन, ज्योती, डॉ. अदिती ड्रायव्हरला घेऊन बीडहून आले. सुनीलने पुण्याहून येताना गाडीच्या डिक्कीत डझनभर पी.पी.ई. किट घेऊन आला होता. ते घालून एक-एक करत सर्व त्याला भेटून आले. संभाजी भोसलेंनी तुळजापूर मध्ये पहाटे अंघोळ करुन अनवाणी पायानें तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन त्यांचा हा जीवाचा मित्र बरा व्हावा असं साकडे घालुन तेथील भवानी मातेचे पवित्र कुंकू सोबत आणले होते. ते बप्पाला लावून त्याचा कांही भाग बेडवर ठेवून खाली आले. अदिती ऍप्रॉन घालून दोन-तीनदा त्याला व डॉक्टरला भेटून आली. दरम्यान तिथे भोसले सरांचे व त्याचे मित्र ऍडव्होकेट विजय सबुकले पाटील, एम्स हॉस्पिटल मॅनेजमेंट चे निकटवर्तीय कांही विद्यार्थी सेनेचे नेते आदी आले. संभाजी भोसले व सुनिल सोबत त्यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटचे संबंधीत व मुख्य डॉक्टर, संजयला अटेंड करणारे डॉक्टर यांच्याशी अर्धा तास मिटिंग-रुम मध्ये चर्चा केली. काळजी करण्यासारखे कांही नाही फक्त त्याचा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स हवाय असे त्यांनी सांगितले. दुपारच्या दोन वाजल्या होत्या. ज्योतीने बीडहून सगळ्यांचे जेवण घेऊन आली होती ते सर्व रस्त्यावरच सुनीलच्या गाडीत बसून खाऊ लागले व मी त्यांचा निरोप घेऊन उदगीरकडे निघालो. वडिलांनी माझी व ड्राइवरची लगेच अँटीजेन टेस्ट घ्यायला सांगितली होती. सकाळी पहिले काम ते केले त्यात मी व ड्राइवर निगेटिव्ह आलो होतोत. त्याचे फॅमिली ग्रुप वर फोटो पाठवले. सुनीलला संध्याकाळी उशीरा हॉटेल मिळाले.  ३-4 दिवस सुनील तिथेच त्याच्या सेवेत होता. दिवसातून किमान २ वेळा आई.सी.यू .मध्ये जाऊन त्याला पाहून, भेटून येत होता. दिवसभर हॉस्पिटल समोर रोडवर गाडीमध्ये बसुन बप्पासाठी प्रार्थना करायचा, गाडीत देवाची गाणी लावायचा. रस्त्यावर जे मिळेल ते खायचा व रात्री झोपायला हॉटेलला जायचा. जे डॉक्टर सांगतील ते मेडिसिन, इंजेक्शन सुनील, सतीश उपलब्ध करुन देत होते. रेमडीसीवरचा कोर्स पूर्ण झाला होता. कुलगुरु पासून अनेक मान्यवरांनी त्याला फोनवर धीर खचू देऊ नका हे सांगत होते. पण तो ट्रीटमेंटला हवा तसा प्रतिसाद देत नव्हता. सुनिललाही इन्फेक्शनची शंका येऊ लागली म्हणून एक दिवस पुण्याला त्याच्या मिसेस ला सोडून तिथली कामे आटोपून येतो असे सतीशला सांगितले व तो पुण्याकडे निघाला.

मी अँटीजेन टेस्ट मध्ये निगेटिव्ह येऊनही दोन-तीन दिवसात मला इथे माईल्ड फिवर व विकनेसचा त्रास सुरु झाला.  कदाचित तेथील आय.सी.यू. चे डबल इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता वाटू लागली. सुनीललाही पुण्याला गेलयावर तिकडे विकनेस जाणवत होते व तो अंथरुणाला खिळला होता.  सुनील व भोसले सरानी फोन वरुन बार्शी चे आमदार राजा राऊत, आ. सतीश भाऊ चव्हाणच्या माध्यमातून कुठे पुणे किंवा औरंगाबादला दुसरे या पेक्षा मोठे हॉस्पिटल मिळते का यासाठी प्रयत्न करत होते. त्यादिवशी म्हणजे सुनील पुण्याला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी बप्पाला अनेस्थेशिया लागला. व्हेंटिलेटर लागले. त्याची प्रकृती ढासळली. उपचाराला प्रतिसाद देत नाही हे कळाले. तिकडे सुनील व भोसले सर परेशान होते. रुबी, सिग्मा हॉस्पिटल कसे मिळतील व त्याच्या शिफ्टिंग साठी फोनवरुन प्रयत्नात होते. रात्री उशिरा सिग्मा हॉस्पिटल मध्ये जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसे सुनीलने रात्री फोनवर मला कळवले होते.  पण नियतीला हे मान्य नसावे हे आम्हा सर्वांचे दुर्दैव. सकाळी त्याच्या घरिवून पुण्याला व मेव्हुणीचा उदगीरला माझ्या मिसेसला बप्पा गेल्याचा फोन आला. एका झंझावाताचा शेवट झाला होता. आमचं आभाळ हरवले होते.

त्याच्या अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवसापासून आम्हा सर्वानांच खूप त्रास होत होता. संजयचे अकाली जाणे हे सर्वांसाठीच धक्कादायी व सहन करण्या पलीकडचेच होते. आई-वडील, सुनील मध्ये कांही त्राण राहिले नव्हते. सर्वांना त्रास होत होता म्हणून आम्ही केलेल्या अँटीजन/आर.टी.पी.सी.आर/ सी.टी. स्कॅनचे आम्हा सगळ्या कुटुंबियांचे रिपोर्ट २-४ दिवसाच्या फरकाने कोविड पॉसिटीव्ह आले होते. विलंब न करता, पुण्याच्या घरापासून ११ कि.मी. दूर बोरा हॉस्पिटलला जिथे बेड मिळाले तिथे सुनीलच्या दोन्ही मुलींनी रात्री दीड वाजता ऍम्ब्युलन्स मागवून आई-वडिलांना ऍडमिट केले. माझा बप्पा स्वर्गात काय खात असेल, त्याला नैवेद्द्य कोण घालील, त्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल, त्याला मोक्ष कसा मिळेल या विवंचनेने त्यांनी अन्न-पाणी सोडून दिले होते. दुसऱ्या दिवशी सुनीललाही त्याच हॉस्पिटलला त्यांच्या बाजूला ऍडमिट केले गेले.  दोन दिवसात घरी वाहिनी,  दोन्ही मुली  व १३ वर्षाच्या सार्थक (कृष्णा) या मुलाचेही रिपोर्ट कोविड पॉजीटीव्ह आले व त्यांनाही कोलंबिया एशिया हॉस्पिटलची होम क्वारंटाईनची ट्रीटमेंट सुरु झाली. इथे मी व माझी मिसेस व नंतर मुलगी व मुलगा सर्वच कोविड पॉजिटीव्ह झालो. चौघे चार रुममध्ये क्वारंटाईन झालो होतोत. त्यात माझी व मिसेसची परिस्थिती बिकट होती. माझा ६ व तिचा सी.टी .स्कॅन चा स्कोर ९ वर पोहंचला होता. १८ दिवस माझ्या घरचा गॅस पेटला नाही. आयुर्वेदिक कॉलेजचे मित्र डॉ. श्रीगिरे व डॉ. बिरादार यांच्यामुळे आयुर्वेदिक कॉलेजचा कुक शिवामामा आम्हाला तेंव्हापासून १८ दिवस दिवसातून तीनवेळा डबे पुरवत होता. रुबी हॉस्पिटलला एक बेड मिळाला म्हणून सुनीलला तिकडे शिफ्ट केले गेले. आई-वडिलांची प्रकृती ढासळत होतो. सुनीलच्या मुली, मेव्हणे, मित्र व शेजारी आमच्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी जीवाचे रान करत होते परंतु संजय गेल्यानंतर अवघ्या ७ व्या दिवशी आमचे माता-पिताही एक तासाच्या फरकाने गेले, तेंव्हा मी ड्राइव्हरसह पुण्याच्या दिशेने प्रवासात होतो.

मी प्रवासात बार्शी जवळ असताना वडील गेल्याचे व टेम्भूर्णीच्या जवळ असताना आई गेल्याचे कळाले होते. त्यावेळी माझे हाल काय असतील?  त्यांचा अंत्यविधी एकत्र व्हावा म्हणून सुनीलचा व माझा मेव्हुणा सर्व प्रयत्नात होते. जसे दवाखान्यात बेड उपलब्ध नव्हते तीच हाल स्मशानभूमीचीही होती. चुलत्याचा फोन आला त्यांना गावाकडे घेऊन ये. ते त्यावेळेच्या परिस्थितीत शक्य नव्हते. कुठल्याच स्मशानभूमीत एकत्र दोन जागा मिळेनाश्या झाल्या होत्या. शेवटी धनकवडी येथे विधीसहितचे अंत्यविधीचे पॅकेज मिळाले ते सुनीलचा मेहुणा निरंजनने बुक केले. रात्री एक वाजता आई-वडिलांचा ऍम्ब्युलन्स मधून स्मशानभूमीकडे अंतिम प्रवास सुरु झाला. पॅकेजवाल्या लोकांनी सर्व सामान आणले होते. माझ्या व सुनीलच्या मेहुण्यानी त्यांच्या पार्थिवावर शेवटचे आहेर चढविले. संजय स्वर्गात जाऊन सहाच दिवस झाले होते तर सुनील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये जीवन-मृत्यूशी झुंजत होता व रात्री दोन वाजता आईचा व वडिलांचा एका पाठोपाठ व बाजू-बाजूलाच धनकवडीच्या स्मशानभूमीत मी अंत्यसंस्कार करत होतो.

तिकडे सुनीलला रुबी हॉल हॉस्पिटलची ट्रीटमेंट चालू होती. हनीवेलची लोकं तो बरा व्हावा म्हणून जीवाचं रान करीत होती. डॉक्टर्स रोज संध्याकाळी फोनवर त्याच्या ऑफिस व घरी त्याचे अपडेट देत होते, व्हाट्सअपवर त्याचे मेसेज येत होते तेही आई-वडिलांच्या प्रकृती बाबतच. त्याला आई-वडिलांचे जाणे कळू दिले नव्हते. सर्व नॉर्मल आहेत हेच सांगितले होते. अदितीच्या परिचित १-२ डॉक्टर्स तिथे होते त्यांच्या कडून ती अपडेट घेत होती, आम्हाला सांगत होती. संजय व आई-वडिलांच्या बातम्या सगळ्या वर्तमान पत्रात, विविध टी.व्ही. चॅनलवरुन येत होत्या. व्हाट्सअँप वरुन व्हायरल होत्या होत्या. अनेक त्यांच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवित होते आणि ही जास्त दिवस लपून राहणारी गोष्ट नव्हतीही. एकदिवस संध्याकाळी हे त्याला कळले त्याक्षणीच त्याने बेडवर माझे आई-वडील असे कसे गेले अशी किंचाळी फोडून त्याने आक्रोश केला आतंक केला. रुबीवरुन कंपनी व घरी फोन आले. रुबीच्या आई.सी.यू. मधील डॉक्टर व स्टाफला तो आवरेनासा झाला होता. डॉक्टारांला त्याला ऍनेस्थेशिया द्यावा लागला. त्या दिवशी तो जो अनकॉन्सिअस झाला, त्याला जे व्हेंटीलेटर लागले ते शेवटपर्यंत निघाले नाही.  जे कोणी सांगेल, सल्ला देत ते ऐकून त्याची आम्हा दोघांच्या बायका लेकरचं नाही तर सुनीलच्या व वडिलांच्या मित्राचे कुटूंबीय सुद्धा त्यासाठी सांगिल सुचवेल ते उपाय मंत्र, जप यंज्ञ करत होते. देवाला साकडे घालत होते. सर्व-सर्व उपाय करुन पाहिले.

सुनीलच्या ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे हे कळल्या नंतर परत मी पुण्याला ड्राइव्हरसह पोहंचलो  व सुनीलच्या डी.एस.के मधील खाली फ्लॅट मध्ये राहू लागलो. निरंजन सोबत रुबी हॉलला जाऊन त्याला पाहून आलो. रुबी हॉल मध्ये डॉक्टर प्रयत्न करत होते पण कुठेच यश मिळाले नाही. तो जाईल हे वाटले नव्हते,  देव एवढा क्रूर असेल हे वाटले नव्हते. संजय नंतर २४ व्या तर आई-वडीला नंतर १६ व्या दिवशी त्याचीही प्राणज्योत मालवली. माझा देवासारखा दुसरा भाऊही माझ्या पासून हिरावला गेला. आमचे चार देव आमच्या पासून दूर-दूर गेले होते. संजयचे अकाली जाणे, सुनीलचे रुबी मध्ये ऍडमिट होणे त्याची काळजी, इकडील माझी काळजी या टेंशन व वरुन कोविड या कारणाने आई-वडील तर आई-वडिलांच्या जाण्याचे कळाल्यामुळे अन त्यात कोविड व या टेन्शनची भर असल्यामुळे सुनीलही गेला. ५४ आणि ५१ ही संजय व सुनीलच्या जाण्याची वयं नव्हती.

संजय/बप्पा, ऐकतोस ना तू स्वर्गातून?  सर्वासाठी चांदणे शिंपीत जाणेच पसंत केलास तू, तुझ्या शेवटच्या दिवसापर्यंत. कुऱ्हाडीलाही चंदनाचा सुगंध देण्याचे संस्कार व परंपरा असलेल्या आपल्या कुटुंबातील तुम्ही चौघेही चार चंदनाची झाडे होतात. तुझ्या नंतर घरातील २४ दिवसात झालेल्या ३ मृत्यूचा दाह आम्ही कसा पचवला असेल हे परमेश्वरालाच कळेल. आता सर्व कोलमडले, खचलेले आहे. ते सावरणेही अशक्य. खूप कर्तत्ववान होतात तुम्ही दोघे. तुझा बँकेतील क्लार्क, नॉन-ग्रॅण्ट वरील असिस्टंट प्रोफेसर ते विद्यापीठाचा प्रोफेसर, कलाकार, अनुवादक, साहित्यिक, तर सुनीलचा फ्युजी, सुल्झर इंडिया व इन-सर्व्हिस एम.बी.ए. करुन थरमॅक्स, हनीवेल ऑटोमोशन इंडिया लिमिटेडच्या बिझनेस हेड व ऑपरेशनल लिडर पर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. प्रगतीच्या उतुंग भराऱ्या घेणारे, कुणालाही हेवा वाटावा असे असणारे आपले संपूर्ण घरच बसले रे! तुला आणखीन कांही मोठी पदे खुणवत होती. मुलीला डॉक्टर झालेले पाहायचे होते तुला. सुनीलला मुलगी किंवा मुलाच्या नावे स्वतःची स्वतंत्र कंपनी काढायची होती. मला कुठेतरी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून पाहायचे होते तुम्हाला. हे पाहायच्या आधीच सोडून गेलास तू. सगळेच संपले हे आता.  एकमेकांसाठी त्याग, प्रसंगी हौतात्म्य स्वीकारणं पसंत करणारे, उजेडाच्या पणत्या सर्वा हाती देणारे प्रकाश-यात्री होतात तुम्ही चौघेही. आई-वडिलांनी शिक्षक व पालक, पोषणकर्ते म्हणून, तू प्राध्यापक, साहित्यिक म्हणून तर सुनील कार्पोरेट जगतात बिझनेस हेड, ऑपरेशन लीडर म्हणून आपापल्या कर्तत्वाचे ठसे हजारो लोकांच्या हृदयाच्या अंतरंगाच्या नकाशावर किती खोल रोवले होते ते तुम्ही गेल्यानंतर शेकडो- हजारो लोकांनी ठेवलेल्या तुमच्या श्रद्धांजलीचे स्टेटस, प्रकाशित झालेले लेख, देश-विदेशातून वाहिलेल्या श्रद्धांजल्या, हळवी झालेली, पाझरलेली प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे यातूनच प्रतिबिंबित होते. 

तू तर अव्वलच होतास रे संजय बप्पा. हजारो विद्यार्थी, कलाकारांना त्यांचं ‘हरवलेले आभाळ’ शोधून देणारा, शेकडोंचा आभाळ झालास याच समाधान घ्यायच्या आतच, त्याचे यश, त्यांना मोठे झालेले पाहण्या आतच सर्वा पासून दूर गेलास. आयुष्यात जो विचार, जी वैचारिकता घेऊन तू जगला होतास, तुझ्या चितेबरोबर त्या सगळ्याचाच अंत झाला आहे. तुझी कमजोरी व ताकत असणाऱ्या तीर्थरुप आई-वडिलांचा ही, तुझी सेवा करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या सुनिल या सगळ्यांच्या लाडक्या भावाचाही अन नावाचाही!  सर्व उध्वस्थ होऊन गेले आहे. आणखीन खूप कांही करायचं राहिलेले होते ते पूर्ण करण्यासाठी, या विनाशाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्या प्रमाणे तुम्ही चौघे पुन्हा जन्माला याल अशी विधाता परमेश्वराकडे प्रार्थना करुन, तशी आशा ठेवतो व तुम्हाला नतमस्तक होवून श्रद्धांजली वाहताना एक शब्द देतो की तुमच्या चौघांच्या प्रेमाला, ऋणाला उतराई होणे शक्य नाही मात्र तुमच्या चौघांच्या आदर्शाला प्रामाणिक राहण्यासाठी शक्य तेवढे व सातत्याने प्रयत्न करीत राहील.

संजय, तुला कोरोना झाल्यापासून ते आज पर्यंत तुम्हा चौघांना मानणारी, तुम्ही जाण्याने अपार दुःख झालेली, आमचे सांत्वन करणारी, आम्हाला धीर देणारी कुलगुरु, आमदार, खासदार, कार्पोरेट जगतातील मान्यवर पासून ते प्राध्यापक, लेखक, कलावंत, विद्यार्थी, शेजारी, मित्र अशी हजारो चांगली माणसे दिसली व अनुभवलीही. त्या सर्व आमच्या सोबत राहिलेल्या चांगल्या माणसांचे आभार मानुन शेवटी या कवितेच्या ओळींनी लेखाची सांगता करत इथेच थांबतो.  

नाही सोसवत आता

दुःख एकलेपणाचे

कसे सांगावेत हाल

तडे गेलेल्या मनाचे


गेला सोबत घेऊन

माता-पिता अण भाऊ,

दुःख गोठल्या घराचे

कसे काळजात ठेऊ?

 

आता आठवती मला 

तुम्हा सोबतीचे क्षण

सदा सावली होऊन

तुम्ही झेललेले ऊन

 

तुम्हा चवघांचे जाणे 

डोळा दाटे महापूर

कसे अचानक माझे

घर गेले दूर-दूर…”

 

-प्रा. डॉ. अरविंद माणिकराव नवले

सहयोगी अधिव्याख्याता व इंग्रजी विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय, उदगीर.

(माजी सदस्य, सिनेट व इंग्रजी अभ्यास मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड)